दिवसामागून दिवस चालले होते. अशाच एका सकाळी अझलान, पवन आणि सुबोध दिवाणखान्यात बसले होते. पवन दोन दिवसासाठी बाहेर जाणार होता म्हणून आज सगळे एकत्र नाष्टा करायला बसले. पवन ऑफिससाठी तयार होऊन बसला होता. सुबोध आणि अझलानचा चेहरा कसल्यातरी विचारात गढला होता. तेवढ्यात त्याच्यासाठी चहा-पोहे घेऊन टिन्या आला. ते खाऊन पवन ऑफिससाठी निघून गेला.
“मला काही तरी विचारायचं आहे तुम्हा दोघांना.” अझलान शांतता भंग करत म्हणाला. “तुम्हाला काही भास होतात का तुम्हाला?”
“म्हणजे नक्की कसल?” टिण्याने उत्साहात विचारले.
“पवनला त्रास नको म्हणून मी आता सांगतोय तुम्हाला.”
“काल परवापासून मला नीट झोप नव्हती लागत. एक प्रकारची गुंगी वाटत होती. तहान लागली म्हणून मी आमच्या खोलीबाहेर पडलो आणि जागेवरच माझे पाय थबकले.”
“का? काय झालं.” टिन्याने घाबरत विचारलं.
“खाली कोणीतरी होत. त्याच डोकं जरा वेगळं दिसत होतं कोणीतरी डोक्यावरून पदर घेतल्यासारखी आकृती. “
सुबोधची नजर त्या चित्रांकडे गेली. जिण्याला लागून असलेल्या त्या भिंतीवरच ते तिसरं चित्र.
“अंधार होता म्हणून काही दिसत नव्हतं पण खिडक्यातून पडणार्या चांदण्याच्या अंधुक प्रकाशामुळे कोणीतरी तिथे आहे हे मात्र दिसत होतं.”
“तुम्ही पावन्याना या घराबद्दल सांगितलं नाय?” टिन्या सुबोधकडे बघत म्हणला.
सुबोधने सगळी कहाणी अझलानला सांगितली. तो शांत झाला. थोडाफार घाम त्याच्या कपाळावर जमला होता.
“नंतर ते कुठे गेलं.” टिन्याला घाम फुटला होता.
“अचानकपणे त्या काळ्या आकृतीचा वेग वाढला आणि ती आकृती पाठचा दरवाजा उघडून निघून गेली. तुम्हाला अगोदर अस काही दिसलय का?”
“नाही मी तर आत असतो झोपायला त्यामुळे रात्री बाहेर काय होत ते जाणवत नाही.” सुबोध म्हणाला.
“आणि तू रे?” अझलानने टिन्याला विचारले.
“मला बी नाय माहीत. मी आगोदर नव्हतो राहायला इथं. तुम्ही आला त्यानंतर मी इथं रातीला राहायला लागलो. मदी सुबोध बाबाची तब्येत पण खराब झालेली त्यो दरवाजा उघडला तवा. म्हणून रघु बोलला की तू रात्री पण थांबत जा.”
“रघु कोण?” अझलानने विचारलं.
“आहे गावातील एक व्यक्ती.” सुबोध म्हणाला.
“मग गेले तीन चार दिवस मलाच हे भास होतायत का? माझी त्यबेत पण ठीक नाही वाटत मला.” अझलान डोकं धरत म्हणाला. “मी वर जातो. महत्त्वाचं काम आठवलं मला.”
दिवाणखान्यात सुबोध आणि टिन्या होते. टिन्याने चहाचे कप ट्रेमध्ये टाकले आणि स्वयंपाक घरात गेला.
सुबोध व्हिलचेअर सरकवत जिन्याजवळ गेला. म्हणजे त्या रात्री जे मी पाहिलं ते खर होत. अझलान म्हणत होता तसं कोणीतरी डोक्यावर पदर घेऊन दिवाणखान्यात फिरत होत. कधी कोपर्यात तर कधी खिडक्यांजवळ. सोफ्याच्या अधून मधून वाकत वाकत जपून पावले टाकत ती काळी आकृती फिरत होती. म्हणजे माझ्या खोलीत चोर नजरेने मी जे काही पाहिलं ते खरं होत. ते जे काही होत ते माझ्या खोलीत का आलं होतं पण? अझलानला तर ती काळी सावली फक्त दिवाणखान्यात दिसली होती. का माहीत पण सुबोध ती काळी आकृती आणि त्या तिसर्या क्रमांकाच्या चित्रामध्ये काही साम्य शोधत होता.
इकडे टिन्या स्वयंपाकघराला लागून असलेल्या एका छोट्या अडगळीच्या खोलीत आपलं गाठोडं खोलून बसला होता. त्यातून त्याने एक जुना फोन काढला. त्याची काही बटन रंग उडालेली होती. त्या मोबाइलच्या पडद्याला तडे गेले होते. त्याच गाठोड्यातून एक कागद काढला. त्यावरील आकडे मोबाईलवर उतरवले. पलीकडून मोबाईलची घंटी वाजू लागली. टिन्या कानाला फोन उत्तराची वाट पाहू लागला.
फोन उचलला गेला. टिन्या काही बोलणार तेवढ्यात पलिकडून आवाज आला,
“बोल.”
“हा! म्या बोलतूय म्या वळखलं का?”
“हो, तू बोल.” पालिकडकचा माणूस म्हणाला.
“मला वाटत लवकर काम उरकायला हवं.”
“मी सांगतोय तसा विधी करतोयस ना तू?”
“हो पण माझ्याकडच सामान संपायला आलंय. मला अजून हवंय. फकस्त एकच दिवसाचा विधी बाकी हाय.” टीन्याने अडचण सांगितली.
“तुला वेळ असेल तर आज ये दुपारी.” पलिकडच्या माणसाने बोलवलं.
“हो म्या आत्ताच निघतो. त्यात आज घरचा सायेब पण दोन दिवस नाय घरात. विधी लवकर उरकायला पायजे!”
टिन्या सगळं आवरून बाहेर आला. सुबोध अजून ही तसाच मान वर करून त्या चित्रांकडे पाहत होता.
“सुबोध बाबा.” टिन्याने पाठीमागून आवाज दिला.
सुबोधने व्हिलचेअर फिरवली.
“म्या जरा बाहेर जाऊन येतो. जरा बाजारात चालूया.”
“बर ये जाऊन.”
“जी.” टिन्या त्याच्या कामासाठी निघाला.
घराच्या प्रवेशद्वाराजवळ जाताच मागे वळून त्याने एक नजर त्या घराकडे पाहिलं. ते भेसूर घर जणू त्याच्याकडेच टक लावून पाहत होत. आज शेवटचा दिस आज शेवटची रात परत तोंड नाही पाहणार तुझं. मनातल्यामनात त्याने त्या घराला शिव्या घातल्या आणि तो प्रवेशद्वारावर थुंकून पुढे गेला.
दुपार झाली. पण काळ्या ढगांमुळे वातावरणात अंधार वाटत होता. अझलान डोळे चोळत जिन्यावरून खाली उतरला. खाली दिवाणखान्यात सुबोध कसलं तरी पुस्तक घेऊन बसला होता. पुस्तक की वही काही नीट दिसलं नाही अझलानला.
“काय झालं डोळे का चोळतोयस.” सुबोधने विचारले.
“अरे लॅपटॉपवर मीटिंग चालू होती. म्हणून एकटक बघत बसलो होतो. खूप थकवा आला म्हंटलं अंघोळ करावी. जरा फ्रेश वाटेल.”
“थांबायच ना जरा.” सुबोध म्हणाला.
“अरे महत्वाची मीटिंग होती. पण यशस्वी झाली. उद्याच मला काही महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करायला जायचं आहे.”
“म्हणजे उद्या जाणार तू?”
“हो.”
“थांबला असतास काही दिवस. सुबोधचा आवाज कमी झाला.”
“महत्त्वाच काम आहे म्हणून जातोय. डोन्ट वरी आपण सगळे एकत्र असू लवकरच.”
“हं”सुबोधने स्मित हास्य आणलं चेहर्यावर.खोट खोट.
अझलान अंघोळीला गेला. त्याने कपडे काढले आणि हलेच पाय उचलत तो बाथटबमध्ये उतरला. त्याने आपला शरीर ढिल सोडलं आणि टबच्या पाण्यामध्ये तरंग पसरले. अतिरिक्त पाणी खाली पडलं. त्याच जड शरीर पाण्यात हलकं भासू लागलं. अंगावरच क्षीण हळूहळू उतरत होता. त्याचे लांब केस पाण्यात मुक्तविहार करत होते. खूप वेळ झाला त्याने डोळे मिटले, तोंड बंद केलं, श्वास भरला आणि अजून खाली सरकला.
थोड्यावेळाने तो परत आला. परत तो खाली सरकला. परत वर आला. तनाव घालविण्यासाठी तो अस करायचं. तो परत खाली गेला. पण वर येताना त्याला त्रास होऊ लागला. त्याचे दोन्ही हात अडकले होते. त्याने डोळे उघडले. आणि ते उघडेच राहिले. पाण्यात डोळ्यांची उघडझाप होऊ लागली. कोणी तरी त्याला वाकून पाहत होत. चेहरा काळा नव्हता पण पाण्याच्या तरंगामुळे स्पष्ट ही नव्हता दिसत. तो चेहरा जवळ आला. जणू त्याला अझलानला निरखून पाहायचं होत. तो चेहरा हसत होता.
अझलानने जोर लावला. हातात बळ आणलं आणि स्वतःला वर खेचलं. पाणी डोळ्यात शिरताच ते चरचरले. त्याने तोंडावर हात फिरवला. आजूबाजूला कोणी ही नव्हतं. तो घाईघाईने उठला. जवळचा टॉवेल ओढला. कसाबसा तो कमरेला गुंडाळून तो पाहिलं बाहेर पडला. उजवीकडे डावीकडे पाहिलं.
त्याला त्या विचित्र दरवाजातून बाहेर जाणारी ओली पाऊले दिसली. तो पळत बाहेर गेला. बाहेर कोणी नव्हतं. बाहेरच्या मातीत पाणी केव्हाच मुरून गेलं होतं, त्यामुळे पुढची पाऊले काही दिसली नाही. त्या दरवाजाच्या उंबर्यात त्यांबलेला अझलान मागे वळला आणि ओरडला “ओह फक!”
मुख्य दरवाजात पिशव्या उभा घेऊन असलेला टिन्या दचकला.
“काय झालं?”
“तू आहेस का? मला वाटलं दुसरंच कोणी तरी आहे.”
“म्हंजी?”
“मी अंघोळ करताना कोणी तरी मला पाहत होत. मी पाठलाग केला तर ते या दरवाजातून बाहेर पडल.” अझलान परत दरवाजाकडे बघत म्हणाला. “तू कुठे गेलेला?”
“म्या बाजारात गेलो होतो.” सामान आणायला.
टिन्याने पिशव्या उचलल्या आणि तडक स्वयंपाक घरात गेला. अझलानला अजून विचारात होता. ओल अंग कोरड करून तो वर गेला.
रात्र झाली आणि अंधार घेऊन आली. अंधाराबरोबर त्या काळ्या सावलीच सावट पण घेऊन आली. टिन्या मनातून बेचैन झाला होता. केव्हा सगळे निजायला जातायत अस झालं होतं त्याला. अझलानला पण केव्हा उद्या उगवतोय अस झालेलं. त्याला स्वतःची ही हालत बघवत नव्हती. काही दिवसातच तो स्वतःला अशक्त समजू लागला होता. त्याचे दंड सुकले होते. मांड्या पोकळ वाटत होत्या.
“हम्मम हा… हो… हो माझं आजच बोलणं झालं… एक नंबर झाली मीटिंग… हो अरे उद्याच जाणार आहे… बघ जमल तर भेटायला ये… उगाच घाई नको करूस.” एवढं बोलून अझलानने फोन ठेवला. त्याच्या समोर सुबोध आला. अरे आतच पवनचा फोन ठेवला मी. त्याला आजच्या मिंटिंगबद्दल सांगत होतो. तू लवकर आलं असतास तर तुझं पण बोलणं झालं असत.
“असुदे, हे घे!” सुबोधने एक काचेची वाटी समोर धरली.
“अरे हे कशाला आणि काय आहे हे?”
“बासुंदी! तू आज जाणार हे माहीत असत तर मी तुझ्या आवडीचं जेवण बनवायला सांगितलं असत. पण आजच जेवण साधं झालं मग मी टिण्याला बोलून बासुंदी करायला सांगितली.”
“अरे कशाला उगाच.” अझलान वाटी घेत म्हणाला.
“अस कस पवनचा खास मित्र आहेस तू तुझ्यासाठी खास करायला नको का काही?” सुबोध हसत म्हणला.
अझलानने ती वाटी चाटूनपुसून साफ केली. बासुंदीच आणि टिण्याचं कौतुक करून झाल्यानंतर सगळे आपआपल्या खोलीत गेले.
घरात सर्वत्र शांतता होती. चंद्रकोर बर्यापैकी वर आली होती. ढगाळ वातावरणामुळे ती दिसत नव्हती. तिच्याबरोबर काळ रात्र पण गडद झाली होती. अझलान बेड वर पसरला होता. एक प्रकारची अस्वस्थता जानवत होती त्याला. तशी ती रोजच जाणवत होती पण आज काही वेगळं वाटत होतं. अंगाला घाम सुटलं होता. डोकं गरगरत होत. नजर अंधुक होत होती. थकवा तर होताच पण झोप नव्हती लागत. कूस बदलणं पण जड जात होतं.
सर्व झोपले आहेत असं समजून टिन्या अडगळीच्या खोलीत गेला. त्याने गाठोडं खोलल. त्यातून एक चिट्ठी काढली एकदा त्यावर नजर फिरवली आणि आपल्या वरच्या खिशात सरकवली. हीच चिट्ठी वेळ प्रसंगी त्याचा जीव वाचवणार होती. एक छोटी पिशवी काढून त्यात सगळं सामान नीट आहे ना हे तपासून घेतलं. त्याने ती पिशवी आपल्या डोळ्या समोर मुठीत धरली. चल आपल्याला जायचं आहे! गोष्टीचा शेवट करायची वेळ आली! चल आपल्या भक्ष्याकडे चल! स्वयंपाक घरातून बाहेर तो दिवाणखान्यात आला. काळामिट्ट अंधार होता तिथे.