Skip to content
AstroPaper
Go back

स्त्रीसुलभ सौंदर्य | भाग १०

Updated:
Edit page

वहिनीने मा‍झ्या हातातून ब्रा पॅन्टी घेतली आणि शेजारच्या साडीवर ठेवली. मग आपल्या ओढणीने माझे अश्रू पुसत म्हणाली, “एवढा का रडतोस? मी नाही नेसवणार तुला साडी. खरंच मी मस्करी करत होते. तू शांत हो आधी.”

मला रडू आवरले नाही. मी लगेच मा‍झ्या शेजारी बसलेल्या वहिनीला मिठी मारली आणि रडायला लागलो.

वहिनीने माझा चेहरा थोडा खाली केला, जेणे करून तिला माझा चेहरा पुसता येईल. आता माझा चेहरा तिच्या चेहर्याच्या जवळ होता. मी डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे पाणावले होते. तिच्या चेहर्यावर चिंता आणि अस्वस्थता होती. मी का रडतोय? हे तिला कळत नव्हते.

ती आपल्या ओढणीने माझे डोळे पुसत होती. आता मला रडताना बघून तीही जवळ जवळ रडायला लागली.

“शेखर, शांत हो ना रे, मी अशी मस्करी पुन्हा कधी करणार नाही. प्लीज रडू नको ना. तुला माझी शपथ.” ती रडवेल्या स्वरात बोलली.

शेवटी वहिनीला अश्रू अनावर झाले आणि ती रडू लागली.

वहिनीचा चेहरा अगदी मा‍झ्या चेहर्याच्या जवळ होता आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या कपाळाला डोकं टेकवून रडत होते. तेवढ्यात तिने दोन्ही हाताने माझे डोके पकडले आणि आपल्या छातीवर दाबून मला घट्ट मिठी मारली.

वहिनीच्या कुशीत मला बरे वाटले. तिच्या मातृत्वाच्या स्पर्शाने मी थोडा शांत झालो. माझे रडणे थांबताच वहिनीने मिठी मोकळी केली.

“मला माफ कर, वहिनी. तू जे विचार करत आहेस, तसे काही नाही आहे. मला तुझ्यामुळे किंवा तुझ्या मस्करीमुळे कधीच वाईट वाटले नाही. पण तू तेव्हा मला शिखा म्हणालीस…” मला एवढंच बोलता आलं.

“तुझं नाव ‘शेखर’ आहे, म्हणून फक्त चिडवण्यासाठी मी तुला ‘शिखा’ म्हणाली.”

आता ती ओढणीने तिचे अश्रू पुसू लागली.

“मी खरंच चुकली रे, मला माहीत आहे सकाळपासून मी तुला खूप त्रास दिला. मी इतकं करायला नको होतं.”

आता हे निश्चित झाले होते की, वहिनीला मी शिखा आहे, हे पहिल्यापासून माहीत नव्हते. ही फक्त माझी भीती होती त्यामुळे मी मा‍झ्या मनात अनेक कथा रचल्या होत्या.

“वहिनी तू मला साडी नेसावली असती, तरीही मी रडलो नसतो. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.”

“मग मला सांग, तू एवढ्या मोठ्याने का रडत होतास? सगळं ठीक आहे ना? जे काही कारण असेल ते मला सांग.” असे बोलून वहिनीने प्रेमाने मा‍झ्या गालावर हात ठेवला.

तिचं बोलणं ऐकून मी गप्प झालो. मला माझी चूक कळून चुकली होती. वहिनीला भावूक होताना पाहून मी पण भावूक होऊन तिला काहीतरी सांगणार होते, जे मला सांगायचे नव्हते.

“काय कारण आहे ते मी तुला सांगू शकत नाही.”

आता वहिनीने कारण जाणून घ्यायचे ठरले होते.

“नको सांगू. तुला लग्न करायचे नसेल तर मी आईला तसे सांगेन. पण एकदा माझ्याशी स्पष्टपणे बोल.”

वहिनीची काळजी आणि निरागसता पाहून माझा भूतकाळ आठवला आणि मा‍झ्या मनात विचार आला की, वहिनी तुला कसं सांगू की, माझं शरीर पुरूषाचं आहे पण माझं मन हळूहळू स्त्रीसारखं झालं आहे. मी पण तुझ्यासारखीच एक स्त्री आहे पण माझं शरीर तुझ्यापेक्षा जरा वेगळे आहे.

तुला कसं सांगू की, मा‍झ्यातील स्त्री या पुरूषी शरीरात गुदमरत चालली आहे. तुला कसं सांगू की, तुला साडीत पाहून मला अस्वस्थ वाटते. तुला कसं सांगू की, मा‍झ्या शेजारी ठेवलेली ही तुझी गुलाबी साडी मला नेसायची आहे. तुला कसं सांगू की, मी मनाने स्वतः मुलगी असून दुसर्या मुलीशी लग्न कसं करू शकतो.

या कोलाहलात मा‍झ्या मनात विचार आला की, वहिनीला सगळं खरं खरं सांगितलं तर? मला ही गुलाबी साडी नेसण्याची माझी इच्छा आहे इथपासून शिखासोबत झालेली ती सहा महिन्यांपूर्वीची घटना, सगळं तिला खरं खरं सांगितलं तर मनावरचे ओझे हलके होईल.

“आता तू पुन्हा का रडतोस? तुला काय त्रास होतोय, तू सांगत का नाहीस? तू मला तुझी मैत्रीण मानतो ना? मग तू मला सांगणार नाहीस का? ए वेड्या, माझ्याकडे बघ. माझं ऐक ना.”

मी मा‍झ्या शेजारी ठेवलेली वहिनीची गुलाबी साडी आणि ब्लाउज हातात घेतला आणि एक दीर्घ श्वास घेऊन तिला माझे सत्य सांगू लागलो, “वहिनी…”

पण मा‍झ्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य कळल्यावर, वहिनी काय प्रतिक्रिया देईल, या विचाराने मी पुन्हा घाबरलो. माझे काय होईल? वहिनी आणि माझे घरचे मला स्वीकारतील की शिवीगाळ आणि मारहाण करून मला घराबाहेर काढतील?

अनेकदा मुलगी व्हायची आवड असणार्‍या मुलांच्या बाबतीत असेच घडते. हे सर्व विचार मा‍झ्या मनात आले आणि थरथरत्या ओठांमधून बाहेर पडणारा माझा आवाज घशात अडकला.

“सांग ना, काय लपवत आहेस?” माझा चेहरा प्रेमाने आपल्या दोन्ही हातात घेऊन वहिनी मला प्रेमाने विचारत होती.

या प्रेमळ भावनेने मला आत्मविश्वास दिला, पण आधी मला वहिनीचा विश्वास हवा होता, ज्याच्या मदतीने मी हे रहस्य आमच्या दोघां मध्येच ठेवू शकेन.

मी तिचा हात मा‍झ्या हातात घेतला आणि म्हणालो, “वहिनी, आधी मला वचन दे की तू कधीच कोणाला याबद्दल काही सांगणार नाही.”

“दिले वचन! मी आजपर्यंत कधी आपल्या दोघांमधील प्रकरण तिसर्या व्यक्तीला सांगितले आहे का?”

माझा हात आपल्या हातात धरून वहिनी पुढे सरकली आणि मा‍झ्या कपाळावर हलकेच एक चुंबन दिले.

मी नजर खाली करून वहिनीच्या हाताकडे बघत म्हणालो, “वहिनी, तुझी काय प्रतिक्रिया असेल मला माहीत नाही. कदाचित तू माझ्यावर हसशील किंवा माझा तिरस्कार करशील किंवा तुला हे सगळं किळसवाणे वाटेल.”

माझे डोळे पुन्हा ओले झाले. मा‍झ्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य मी सांगताना माझी अस्वस्थता शिगेला पोहोचली. माझा घसा कोरडा होऊ पडला.

वहिनीने मा‍झ्या हातातून साडी आणि ब्लाउज घेतला आणि मा‍झ्या शेजारी ठेवला. मा‍झ्या दोन्ही हातांच्या तळव्यांवर आपल्या दोन्ही हाताचे तळवे ठेवून मला आश्वासक स्वरात म्हणाली, “शेखर, तुझा माझ्यावर इतकाही विश्वास नाहिये का? मी तुला किती जवळ मानते. मी तुझा तिरस्कार कसा करेल?”


(क्रमशः)


Edit page
Share this post:

मुख्य कथा: स्त्रीसुलभ सौंदर्य